भारताच्या प्रगतीचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाच : देवेंद्र फडणवीस
Santosh Gaikwad
December 06, 2023 07:27 PM
मुंबई : आज भारत अतिशय वेगाने प्रगती करत आहे. आपण जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार आहोत. पण याचे श्रेय जर का कोणाला जात असले तर ते खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला जाते असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाला अभिवादन केल्यानंतर चैत्यभूमी परिसराच्या आवारात शासकीय कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संविधानाने या देशामध्ये एक अशी व्यवस्था उभी केली की, ज्या व्यवस्थेमुळे मूठभर लोकांनाच नाही तर सकल बहुजनांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाच्या मुख्य धारेमध्ये समाजातले सर्व लोकं हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले. म्हणूनच आज ही प्रगती होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा संविधानाचा उल्लेख केला आहे. मला कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे अधिक महत्वाचे हे पंतप्रधानांनी सांगितले आहे, असेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना समता आणि बंधुता या गौतम बुद्धांच्या तत्त्वांच्या आधारावर लिहिले आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की शांतीच्या मार्गावर चालून देखील जगामध्ये एक आपली आगळीवेगळी प्रतिमा ही याठिकाणी उभी झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून केलेले काम असेल, मजूर मंत्री म्हणून केलेले काम असेल, पाटबंधारे मंत्री म्हणून केलेले काम असेल, ऊर्जा मंत्री म्हणून काम असेल, हे प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचे पहिले पाऊल ठरलेले आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.
अनेक वर्ष इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांना विनंती करून इंदू मिलची जागा मिळवली. आज त्या ठिकाणी भव्य स्मारक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्याचे काम अतिशय वेगाने करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होऊन त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता येईल, अशी आशा यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.