उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा मृत्यू : सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विरोधकांकडून मागणी

Santosh Gaikwad April 17, 2023 12:46 AM

 मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भर उन्हात हा कार्यक्रम पार पडल्याने  उष्माघातामुळे अकरा श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण उष्माघातामुळे अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  


मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी डॉक्टरांना भेटलो आणि त्यांच्याशी या विषयी बोललो. अनेक लोकांना उष्माघातामुळे त्रास झाला आहे. ही दुख:द घटना आहे, मनाला वेदना देणारी घटना आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच अत्यवस्थ रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येईल आणि मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला.श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत' 



सरकारवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा  विरोधकांकडून मागणी 


उष्माघातामुळे घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी या घटनेला सरकार जबाबदार असून या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करून सरकारला धारेवर धरले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण अस्वस्थ आहेत हा सरकारने केलेला मनुष्यबोध आहे त्यामुळे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे.