१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा : ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

Santosh Gaikwad May 25, 2023 09:26 PM


मुंबई : शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन केली. 


 शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. ठाकरे गट शिंदे गटाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. आज ठाकरे गटाच्या नेत्यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन दिलं आहे. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, अजय चौधरी आणि रवींद्र वायकर उपस्थित होते.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. 

ठाकरे गट आता कोर्टाच्या निकालाच्या तारखेपासून तीन महिने कालावधी होईपर्यंत वाट पाहणार आहे. तीन महिन्यांपर्यंत निर्णय न झाल्यास ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये मणिपूर प्रकरणाचा संदर्भ घेऊन ही चर्चा झाल्याची माहिती आहे.