गरीबांसाठी चांगल्या शाळा बांधल्या म्हणून मला जेलमध्ये टाकले : अरविंद केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल
Santosh Gaikwad
May 17, 2024 10:38 PM
भिवंडी : मला जेलमध्ये का टाकले ? मी छोटा माणूस आहे. आमची दोन राज्यात सत्ता आहे. हे तर ताकदवार माणसं आहेत. मला जेलमध्ये टाकले कारण मी दिल्लीत चांगल्या शाळा बांधल्या. मी गरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, त्यामुळे मला तुरुंगात टाकण्यात आले. मी सरकारी शाळांना शानदार बनवले. त्यामुळे मला तुरुंगात टाकले. तुम्ही देशात ५० हजार शाळा बनवा, तर मोदीजी तुमचे मोठेपण असेल, असं म्हणत अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात ? मोदीजी तुम्ही भित्रे आहात. मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला १५ दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत असे केजरीवाल यांनी सांगितलं.
मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, २१ दिवस झोपणार नाही. २४ तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे असे केजरीवाल म्हणाले.
*****