मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. पक्षाचं काम करण्यासाठी मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्यात यावं अशी विनंती वरिष्ठांकडे करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. तर गेल्या निवडणुकीत २३ खासदार निवडून आणणाऱ्या भाजपची ९ जागांपर्यंत घसरण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. दरम्यान फडणवीस यांच्या घोषणेनंतर त्यांच्या मनधरणीसाठी भाजपचे नेते आणि मंत्रयांची सागर बंगल्यावर धाव घेतली होती.
बावनकुळे म्हणाले, आम्ही सगळेच जबाबदार !
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराजयाला केवळ ते एकटेच जबाबदार नाही. तर आम्ही सगळेच जबाबदार आहोत. परंतु त्यांनी सरकारमधून बाहेर जाण्याची काही एक गरज नाही. त्यांनी सरकारमध्ये राहून आम्हाला पक्षसंघटनेसाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती भाजपच्या कोअर कमिटीने फडणवीस यांना केल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
------