देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम ; एकनाथ शिंदे फक्त चेहरा :- नाना पटोले

Santosh Gaikwad August 31, 2023 06:09 PM


मुंबई, दि. ३१ ऑगस्ट  :  राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु आहे. अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.


टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील तिघाडी सरकारमध्ये मलईसाठी भांडणे सुरु आहेत, राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पिण्याचे पाणी नाही, चारा नाही, त्याकडे सरकारचे लक्ष नाही आणि तिन्ही पक्षात खुर्चीच्या वर्चस्वाची लढाई सुरु आहे. दोन दिवसापूर्वी मंत्रालयात शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन आंदोलन करत सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. सरकार स्थापन होऊन दिड वर्ष होत आहे पण अजून १७ जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकत नाहीत. महाराष्ट्र झपाट्याने पिछाडीवर जात असताना सरकारमधील मंत्री मात्र खोटे आकडे दाखवत जनतेची फसवणूक करत आहेत. 


मनसेने सरकारला जाब विचारावा...


मनसेने इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थीती आहे याची आम्हाला जाणीव आहे, देशभरातून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेनुसार केले जाणार आहे. झुणका भाकर, वडापाव व पुरणपोळी हे महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ जेवणात असणार आहेत, ही मेजवानी कशी? राज्यात दुष्काळी परिस्थितीला तिघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, मनसेने सरकारला जाब विचारला पाहिजे.  असे पटोले म्हणाले या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आमदार वजाहत मिर्झा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते