माढयाचे राजकीय समीकरण बदलणार, भाजपवासी धैयशील मोहितेंनी फुंकली तुतारी

Santosh Gaikwad April 14, 2024 08:41 PM


सोलाूपर :    माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते. त्याच नाराजीतून धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी सायंकाळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.  धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षबदलामुळे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. आता मोहिते पाटील विरोधात गेल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली आहे. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळविला होता. आता दहा वर्षांनी मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते निवडणुकीत उतरल्याने २०१४ ची पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता आहे.

 माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकरिता १६ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज सोलापूर येथे भरण्यात येणार आहे,' असे शरद पवार यांनी रविवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.