दिलीप करंगुटकर क्रिकेट स्पर्धेत कस्तुरबा हॉस्पिटलचा पहिला विजय सलामीवीर अंकुश जाधवच्या अष्टपैलू खेळामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा २६ धावांनी पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची पहिली साखळी लढत जिंकली. डॉ. मनोज यादवने अष्टपैलू खेळ करूनही सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी अष्टपैलू अंकुश जाधव व डॉ. मनोज यादव यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविले. सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुध्द नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या कस्तुरबा हॉस्पिटलचा डाव सलामीवीर अंकुश जाधवने (२२ चेंडूत ३३ धावा) आठव्या विकेटपर्यंत सावरला. अंकुशसह रोहन ख्रिस्तियन (१३ चेंडूत १८ धावा), दीपक नाखवा (२१ चेंडूत १९ धावा) व रुपेश कोरवे (१५ चेंडूत १५ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने २० षटकात सर्वबाद १२८ धावांचा टप्पा गाठला. डॉ. मनोज यादव (२६ धावांत २ बळी), स्वप्नील शिंदे (९ धावांत ३ बळी), विशाल सावंत (२३ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. सलामीवीर डॉ. मनोज यादव (३९ चेंडूत ३८ धावा) व सुशांत गुरव (२३ चेंडूत ३१ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची मोठी भागीदारी करूनही सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा डाव १ बाद ७१ धावांवरून १९ व्या षटकाला अवघ्या १०२ धावसंख्येवर गारद झाला. त्याचे श्रेय अंकुश जाधव (२० धावांत ३ बळी), महेश सनगर (२४ धावांत ३ बळी), सुनील शिंदे (२२ धावांत २ बळी) आदींच्या अचूक गोलंदाजीला ध्यावे लागेल. परिणामी कस्तुरबा हॉस्पिटलने २६ धावांनी पहिला साखळी सामना जिंकून दोन गुण वसूल केले. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.