गृहनिर्माण संस्थांचा कन्वेयन्स, पुनर्विकासबाबत मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Santosh Sakpal May 04, 2023 07:02 AM

मुंबई :डीम कन्वेयन्स-मानवी अभिहस्तांतरण, तंटामुक्त संस्था, पुनर्विकास/स्वयंपुनर्विकास आदी विषयांवर सहकारी संस्था, मुंबई शहर १ चे जिल्हा उपनिबंधक श्री. नितीन काळे, सहकारी संस्था, जी/एन विभागाच्या उपनिबंधक श्रीमती बकुळा माळी, मुंबई जिल्हा सहकारी हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश दरेकर, अॅड. डी.एस.वडेर आदी मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन दादर-पश्चिम येथील साने गुरुजी विद्यालय सभागृहात केले. परिणामी उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये उपस्थिती दर्शविलेल्या मुंबई जी/एन विभागातील गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी-सभासदांच्या शंकाचे मोठ्या प्रमाणावर निरसन होतांना दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक श्री. अनिल कवडें यांची मानवी अभीहस्तांतरण योजनेची विशेष मोहीम यशस्वीरीत्या मार्गी लागणार आहे. याप्रसंगी मान्यवरांनी उपरोक्त संदर्भातील शासनाच्या मार्गदर्शन पुस्तिकेचे वितरण केले.

उपनिबंधक श्री. नितीन काळे यांनी तंटामुक्त संस्था होण्यासाठी पाच सूत्री उपाय योजना सहकारी गृहनिर्माण संस्थाना सुचविल्या. वर्ष संपताच ३ महिन्यात वार्षिक सभा घेऊन तद्संबंधीचे ऑडीट रिपोर्ट्स, वार्षिक अहवाल, सभा वृत्तांत सर्व सभासदांना वेळेतच द्यावेत. एक तृतीयांश सभासदांनी विशेष सभा मागितल्यास त्वरित कार्यवाही करणे. सदनिका विकतांना सोसायटीच्या ‘एनओसी’ ची आवश्यकता नसली तरी सदनिका घेणाऱ्या व्यक्तीला कर्जासाठी लागणारी एनओसी वेळेपूर्वी ध्यावी. मेंटेनन्स आकारणी, न भरल्यास दंड आदी नियमानुसारच करावे. सोसायटीचे आर्थिक वर्ष संपताच ४५ दिवसात ऑडीट करून घेणे. नवीन कमिटी निवडण्याची प्रक्रिया मुदत संपण्यापूर्वी ४५ दिवस अगोदरपासूनच सुरु करावी. यामुळे सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन सोसायटी तंटामुक्त राहील, असा सल्ला दिला. मानवी अभिहस्तांतरणबाबत देखील सोप्या शब्दात माहिती देताना त्याची गरज पुनर्विकास करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे श्री.नितीन काळे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केल्याबद्दल मुंबई जी/एन विभागाच्या उपनिबंधक श्रीमती बकुळा माळी यांचे सुगत निवास पुनर्विकास समितीच्यावतीने तसेच अनेक सभासदांनी विशेष अभिनंदन केले.


*************