१६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी दोन आठवड्यानंतर !
Santosh Gaikwad
September 14, 2023 06:58 PM
मुंबई, दि. १४ः राज्याचे लक्ष वेधलेले शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची पहिली सुनावणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली. शिंदे आणि ठाकरे गटाने युक्तिवाद केला. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाला कागदपत्रे अदानप्रदान करण्यास दोन आठवड्यांची मुदत दिली. त्यामुळे पहिल्या सुनावणीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता दोन आठवड्यानंतर आमदार अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी होणार आहे.
शिवसेनेतून बंडोखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ४० आमदारांवर अपात्रतेची कारवाईबाबत ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद आणि गटनेते पद अवैध ठरवले आहे. तसेच तीन महिन्यांत या घटनेचा निकाल देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यानुसार विधिमंडळात गुरुवारी दुपारी १२ वाजता शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली. शिवसेनेकडून (ठाकरे) असिम सरोदे आणि शिंदे गटाडून अनिल सिंग या वकिलांनी एकमेकांविरोधात जोरदार युक्तिवाद केला.
ठाकरे गटाचे म्हणणे..
शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी या प्रकरणातील सर्व याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी एकाच वेळी सुनावणी घ्यावी, अशी मागणीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले तसेच त्यांनी प्रतिवाद्यांना कागदपत्रे द्यायला हवीत, असे म्हणणे मांडले.
शिंदे गटाचे म्हणणे..
शिंदे गटाच्या वकिलांनी त्यावर आक्षेप नोंदवत, प्रभू यांच्याकडील कागदपत्रे आम्हाला मिळाली नाहीत. गणेशोत्सव तोंडावर असल्याने कागदपत्रे सादर करण्यास दोन आठवड्याची मुदत मिळावी, अशी विनंती केली.
नार्वेकरांनी त्यानुसार दोन्ही बाजूच्या आमदारांना कागदपत्रे एकमेकांकडे देणे आणि दोन्ही गटाकडून लिखीत उत्तर घेण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला. तसेच लवकरच पुढील तारीख जाहीर करू, असे स्पष्ट केले. त्यामुळे दोन आठवड्यांसाठी सुनावणी पुढे गेली आहे.