मुंबई, – बीएनपी पारिबस कंपनीने दान २०२३ हा त्यांचा वार्षिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे. यावर्षी बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी डाळ, तांदूळ आणि पीठ मिळून एकत्रितपणे ३२,००० किलो धान्याचे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला दान करत त्यांच्या घरात सणांचा आनंद फुलवला. हा उपक्रम देशाच्या तीन भागात – मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता.
भारतात कायमच भूकेची समस्या चिंताजनक बाब राहिली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२३ नुसार भारत अशा १२५ देशांमध्ये १११ व्या स्थानावर असून गेल्या काही काळात त्यात किंचित सुधारणा झाली आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक असून दान उत्सवसारखे उपक्रम भुकेविरोधातील भारताच्या लढाईत सकारात्मक योगदान देतील.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएनपी पारिबसने वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी (एनजीओ) करार केला असून त्यात असीमा (महाराष्ट्र), आधार (महाराष्ट्र) बीजे होम्स (महाराष्ट्र) प्रेमा वासम (चेन्नई) रॉबिनहूड आर्मी, समर्थानम (कर्नाटक) आण अध्वम उल्लंगल (तमिळ नाडू) यांचा समावेश होता. या संस्थांच्या मदतीने दान करण्यात आलेल्या अन्नाचे प्रभावी वितरण आणि वापर होईल याची काळजी घेण्यात आली. या संस्था तळागाळातील समाजापर्यंत पोहोचण्याच्या आपल्या कौशल्याच्या मदतीने वंचित घरांतील मुले व प्रौढांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.
१२९०० किलो तांदूळ, १३६०० किलो पीठ आणि ५३०० किलोपेक्षा जास्त डाळीचे या उपक्रमाअंतर्गत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी धान्याचे प्रभावी वाटप करण्यात प्रत्यक्षातही सक्रिय मदत केली.
कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि एनजीओ भागिदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बीएनपी पारिबसच्या सीएसआर, ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख श्रीमती मनिषा खोसला म्हणाल्या, ‘दान उत्सवच्या आणखी एका आवृत्तीची यशस्वी सांगता करताना कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम अपूर्ण आहे. त्यांच्या दातृत्वामुळे सणांचा हा काळ आणखी प्रकाशमान झाला, शिवाय समाजाच्या कल्याणाची सर्वांवर असलेली एकत्रित जबाबदारी यानिमित्ताने अधोरेखित झाली.’
‘त्याशिवाय गोळा करण्यात आलेल्या धान्याचे प्रभावी वाटप करणाऱ्या आमच्या प्रतिष्ठित एनजीओचेही मी आभार मानते. एकत्रितपणे आम्ही सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारा बदल घडवून आणू आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडू अशी मला खात्री वाटते.’
बीएनपी पारिबस विविध स्त्रोतांचा वापर करत गरजूंच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी बांधील आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांतून कंपनीने समाजात भरीव बदल घडवून आणण्याप्रती आपला निश्चय दाखवून दिला आहे.