कर्ज, गैरव्यहारामुळे जिल्हा बँका अडचणीत अन्यथा पीक कर्जावर गंडातर येईल : सहकार मंत्री वळसे-पाटील यांची कबूली
Santosh Gaikwad
July 12, 2024 07:07 PM
मुंबई, दि. १२ः महाराष्ट्रातील अनेक जिल्हा बँका कर्ज वसूलीत अपयश आणि गैरव्यवहारामुळे अडचणीत आल्याची कबुली सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. या बँका जिवंत राहिल्या नाहीत, तर शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना गंडातर येईल, अशी खंतही व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यमर्ती बँकेतील अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून संचालकांनी मोठ्या प्रमाणात मनमानी सुरु केली आहे. यापूर्वी चौकशीचे आदेश दिले तेव्हा जवळपास २२ प्रकरणात अनियमितता झाल्याची गंभीर बाब समोर आली. बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा या प्रकरणाची आणि बँकेतील नोकरभरतची सखोल चौकशी करून संचालकांवर गुन्हे दाखल करणार काय, अशी विचारणा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. या लक्षवेधीच्या चर्चेत प्रवीण दटके व अमोल मिटकरी यांनी सहभाग घेत उपप्रश्न विचारले. वळसे - पाटील यांनी त्या प्रश्नांना उत्तर दिली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ८३ अन्वये चौकशी केली आहे. याप्रकरणी १५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून २ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. त्यात काही चुका व अनियमितता असल्यास नक्कीच कारवाई करणार, असा इशाराही वळसे - पाटील यांनी दिला. तसेच लवकरच या संदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी खासगी सावकारांकडे जातात. परंतु शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँका जिवंत राहिल्या पाहिजेत. अन्यथा पीक कर्जावर गंडातर येऊ शकतो, अशी खंत वळसे - पाटील यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.