भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या ही मोदींची गॅरेंटी : उद्धव ठाकरेंची टीका
Santosh Gaikwad
February 13, 2024 05:02 PM
शिर्डी: शिवसेना (ठाकरे गट ) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सोनई येथे उद्धव ठाकरेंची पहिली सभा पार पडली. या सभेदरम्यान, ठाकरेंनी अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर केलेले घोटाळ्याचे आरोप यावरुन जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या ही मोदींची गॅरेंटी आहे अशी टीका ठाकरे यांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री यांनी काढलेल्या श्वेत पत्रिकेत आदर्श घोटाळ्याच नाव आहे. फडणवीस म्हणाले अशोक चव्हाण लीडर नाही डीलर आहे, मग आता कशाला घेतलं? अब्रू नाही तर घाबरु कशाला?अब्रूचे धिंडवडे निघालेत," अशी टीकाही ठाकरेंनी केली.
ठाकरे म्हणाले, "आपला पक्ष चोरला, चिन्हं ठेवलं नाही. माझ्या हातात काही नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात. मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो. गडाख आणि आपली आधी जवळीक नव्हती. २०१९ ला अपक्ष लढले, आमच्याकडे आले त्यांना मंत्री केलं, गद्दार तिकडे गेले असते, तर आज देखील तुम्ही मंत्री असतात, पण तुम्ही गेला नाही.." असे ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले की, कदाचित मी देशातला पहिला मुख्यमंत्री असेन की मी सत्ता आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. अजूनसुद्धा पंचनामे करण्याचे आदेश मुख्यंत्र्यांनी दिले नाहीत, आता तुमच्याच नालायक कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आली.ही जनता तुमच्या नालायक कारभाराचा पंचनामा करेल," असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, "आपलं हिंदुत्व घरातील चूल पेटवणार आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार आहे. भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या ही मोदींची गॅरेंटी आहे. फडणवीस म्हणाले आम्ही फिल्टर लावलाय. काय फिल्टर लावलय तू ७० हजार कोटींचा घोटाळा केला ये तुला उपमुख्यमंत्री करतो. त्यापेक्षा मोठा घोटाळा केला, ये तुला मुख्यमंत्री करतो हे भाजपचं हिंदुत्व आहे? अशा शब्दात ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.