मुंबई दि. १७ (प्रतिनिधी) : कोलकात्यातील महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल मुंबई ठाणे आणि कल्याणात तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी देशभरात आयएमने पुकारलेल्या बंदला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडीयन मेडीकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तत्पूर्वी आयएमए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोवीड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली.
ठाण्यात कोपरीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. देशभरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांचा संप पुकारण्यात आला होता. या संपाला पाठिंबा देण्यासाठी तारामाऊली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या वतीने कोपरीमध्ये रॅली काढण्यात आली. कोपरी कॉलनी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, स्टेशन रोड, भाजी मार्केट, ठाणेकरवाडीहून कन्हैय्या नगरपर्यंत काढलेल्या रॅलीत शेकडो कोपरीकर सामील झाले होते. या रॅलीत दोषी आरोपींचा तीव्र धिक्कार करण्यात आला. तसेच महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदे आणखी कठोर करण्याची मागणी करण्यात आली.