भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली !

Santosh Gaikwad May 23, 2024 06:18 PM


डोंबिवली : एमआयडीसीतील कंपनीत बॉयलर स्फोट होऊ लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.  तर  ४८ जण जखमी झाले आहेत जखमींना नजीकच्या रूग्णायात उपचार सुरू आहेत या स्फोटाने पून्हा एकदा डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाटयावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची तातडीने दखल घेत अधिका-यांना सुचना दिल्या,

डोंबिवली एमआयडीसीतील फेज २ मधील सोनारपाडा येथेील मे अंबर  या केमिकल कंपनीत दुपारच्या सुमारास अचानक बॉयलरचा स्फाेट झाला हा स्फोट इतका मोठा होता की  स्फोटाने आजूबाजूच्या परिसरातील इमारती हादरल्या ऑफीसच्या आणि घरांच्या काचा फुटून खाली पडल्या. मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले रस्त्यावरील नागरिकांनी पळ काढला. स्फोटानंतर धुराचे आणि आगीचे लोट हवेत पसरले. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या तीन ते चार कंपन्यांपर्यंत ही आग पसरली मागील बाजूस असलेल्या कारच्या शोरूमला ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटाने डोंबिवली हादरून गेली असून या मध्ये जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. 
 
स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ३ ते चार किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरून गेला.  अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयतन सुरू आहेत आग भीषण असल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवताना अडथळा येत आहे धुराच्या प्रचंड लोटमुळे त्यांना आत शिरणेही मुश्किल झाले होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने अंबरनाथ कल्याण आजूबाजूच्या परिसरातू अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. 


नऊ वर्षांपूर्वीच्या स्फोटाची आठवण
 
१६ मे २०१६  रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन १२ जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशे वर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते.   आज तिच पुनरावृत्ती डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होवून झाली आहे. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आता पुन्हा तेच तेच चौकशा समित्या नेमली जाणार का ?  प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. आज झालेल्या स्फोटाने अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे समजले आहे. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनार पाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. सदर भागात काही लोखंडी भागांचे अवशेष पडल्याचे दिसत आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभयीत झाले असून असे काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी मधील अती धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात ही येथील जनतेची मागणी आता तरी पूर्ण करा अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली.

परिस्थिती नियंत्रणात : मुख्यमंत्री शिंदे 

कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाला त्यानंतर आग लागली. जिल्हाधिका- यांशी चर्चा केली आहे बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत सर्वच यंत्रणा पोहचली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 


डोंबिवलीची घटना वेदनादायक : फडणवीस 

डोंबिवलीच्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी ट्विट करीत दु:ख व्यक्त केले आहे या आगीत आठ जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत जिल्हाधिका-यांशी माझी चर्चा झाली असून एनडीआरएफ टीडीआरएफ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो असं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चौकशी करणार : रविंद्र चव्हाण 
 
स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले डोंबिवली स्फोटाची घटना अतिशय गंभीर आहे या स्फोटामुळे जखमी झालेल्या रूग्णांवर होणा-या उपचारांना यश यावे अशी प्रार्थना आहे ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत याबाबत प्रशासनाला योग्य  त्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.