पावसामुळे अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका, अधिवेशन पूर्णवेळ चालवा :- नाना पटोले

Santosh Gaikwad July 27, 2023 02:47 PM


मुंबई, दि. २७ जुलै : मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.


प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्य सरकार पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम ४ ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. हा दुसरा आठवडा सुरु आहे. आणखी एक आठवडा बाकी असताना अधिवेशन संपवणे हे योग्य नाही. राज्यात आज अनेक समस्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, तरुणवर्ग, महिला, बेरोजगारी, महागाईसह अनेक प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींसाठी अधिवेशन हेच महत्वाचे व्यासपीठ आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नासाठी अधिवेशन पूर्ण वेळ चालवले पाहिजे.

 

*राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम*.


शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात गांधी आणि गोडसेवर नेहमीच चर्चा होत आली आहे. गांधी विचाराला मानणारा  मोठा वर्ग आहे. परंतु संघ परिवाराने गांधी परिवाराची नेहमीच बदनामी केली आहे. गांधी हे हिंदू विरोधी आहेत असा अपप्रचार करून गांधी परिवाराची बदनामी करण्याचे काम संघ परिवार करत आला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनेक वर्ष संघ विचारातून आलेल्या भाजपाबरोबर युतीत होती. आरएसएस गांधींबद्दल जे सांगत होते ते चुकीचे आहे हे त्यांना आता समजले आहे. राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात आहे. उद्धव ठाकरे यांना आता वास्तवाची जाणीव झाली आहे. भाजपा हा कोणाचाही नाही, हिंदू, मुस्लीम, शिख ख्रिश्चन कोणाचाच नाही, भाजपा फक्त धर्माच्या नावावर राजकारण करत असून भाजपा फक्त सत्तेचा आहे असे पटोले यांनी सांगितले.


*शिक्षणक्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करा*...


विधानसभेतील चर्चेत भाग घेत नाना पटोले म्हणाले की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणातून आपण पिढ्या घडवतो, मानवी जिवनासाठी शिक्षण महत्वाचे आहे. या क्षेत्रातील भ्रष्टाचार उपटून टाकण्यासाठी मुळावर घाव घातला पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नसते, या भ्रष्टाचारात शिक्षण संस्थांचाही दोष आहे. पण शिक्षण क्षेत्रात पसरलेला हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे, असे पटोले म्हणाले.