दुष्काळग्रस्त ४० तालुक्यातील लाभार्थ्यांना मदत देण्यासाठी ई- केवायसी अनिवार्य !
Santosh Gaikwad
July 09, 2024 07:19 PM
मुंबई, दि. ९ः दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यातील लाभार्थ्यांना मदत देण्यासाठी ई- केवायसी अनिवार्य आहे. शेवटच्या शेतकऱ्यांची ई- केवायसी होईपर्यंत मुदत वाढविण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केली. तसेच येत्या १५ दिवसांत लाभार्थ्यांसाठी विशेष मोहिम राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी विधान परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अंबदास दानवे, आमदार शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन, दृष्काळी भागातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने केलेल्या मदतीची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी केली. मंत्री पाटील यांनी त्यावर उत्तर दिले.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी शासनाला आवश्यकता भासल्यास मुदत वाढवली जाईल. मदत व पुनर्वसन विभागाकडून ई-केवायसीची मोहीम लवकरात लवकर करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यासाठी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. त्या भागातील विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत केली जाईल. एन.डी.व्ही.आय. (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार हे ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. जिरायत, बागायती पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत शासन मदत करत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद मदतीच्या निकषापेक्षा जास्त मदत दिली जात आहे. तसेच दृष्काळी भागातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटीबद्ध आहे. ई- केवायसी करण्यास मुदतवाढ दिली जाईल. येत्या १५ दिवसांत विशेष मोहिम राबवणार असल्याचे पाटील यांनी परिषदेत ग्वाही दिली.