शरद पवारांना दिलासा : निवडणूक आयोगाने बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवली !

Santosh Gaikwad July 19, 2024 09:03 PM


मुंबई :  निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील बिगुल आणि तुतारी  हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.
  
 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिलं होतं.  याच चिन्हावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा निवडणूक लढवली होती. तर याच निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह दिले गेले होते. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभेच्या १० जागा लढवल्या होत्या. नाशिकसह सर्वच जागांवर अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत या चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता.  

  
 लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे  शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवले आहे. पण त्याचबरोबर  तुतारी हे चिन्ह देखील गोठवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बिगुल आणि तुतारी ही चिन्हे नसणार आहे.

लोकसभा निवडणुकीत  तुतारी या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी  तुतारी चिन्हाला  मिळाली होती.  या विरोधात निवडणूक आयोगात पक्षाने दाद मागितल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने बिगुल आणि तुतारी ही मुक्तचिन्हे गोठवल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी पत्राद्वारे माहिती   दिली आहे.