मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर जागांसाठी येत्या २७ जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त हेाणा-या ११ जागांसाठी येत्या दि १२ जूलैला निवडणूक होणार आहे. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतांच्या फाटाफुटीचा धोका सर्वच पक्षांना असल्याने विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे.
लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस १३, ठाकरेंच्या शिवसेनेला १०, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ८ तर भाजप ९, शिंदे सेनेला ७, राष्ट्रवादी अजित पवार १ अशा जागा मिळवल्या आहेत. मागील वेळेस २३ जागा पटकावणा-या भाजपला अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे १४ जागांवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीला १५० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांतून आघाडी मिळाली आहे. लोकसभा निकालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा मूळ राष्ट्रवादी वा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपल्याने महायुतीतील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असते. विधानसभेसाठी आपली उमेदवारी पक्की करण्याकरिता बंडाच्या पवित्र्यात असलेले आमदार पक्षाच्या विरोधात मतदान करू शकतात असा धोका समजला जात आहे. याबरोबरच काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतात. यामुळेच भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार गट यापैकी कोणत्याही पक्षांचे आमदार विरोधी मतदान करू शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अखेरची संधी असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतांची फाटाफूट किती होते यावरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
विधानसभेच्या १४ जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी १० जागा या आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहेत. चार जागा या आमदारांच्या निधनाने रिक्त आहेत. परिणामी २७४ सदस्यांमधून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. जागा कमी झाल्याने निवडून येण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल. त्यामुळे या निवडणुकीत काय घडतयं याकडे लक्ष वेधलय.
असा असणार निवडणूक कार्यक्रम २५ जून रोजी या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर दि २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जुलै रोजी आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १२ जुलै रोजी होणार आहे. १२ जुलै (शुक्रवार) रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १२ जुलै रोजीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
या ११ आमदारांचा कार्यकाळ संपणार ..विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) हे ११ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे या ११ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
-----------