मुंबई, दि. : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी दि १० जूनला मतदान होणार होतं. पण १० जूनला अनेक शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य करीत शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.
मुबंई पदवीधर मतदारसंघावर सध्या विलास पोतनीस हे विद्यमान आमदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर किशोरे दराडे हे विद्यमान आमदार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. या सर्व आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा येत्या ७ जुलै २०२४ ला संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली. दरम्यान, शाळा १५ जून रोजी सुरू होत असल्याने अनेक शिक्षक गावी जाणार आहेत त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होणार असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी शिक्षक संघटना व राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती
----