मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलला गतवैभव प्राप्त करून द्यावे- छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी
Santosh Gaikwad
March 21, 2023 12:00 AM
*मुंबई, नाशिक,दि.२१ मार्च :-* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रमोद नवलकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीने शिक्षण घेतलेल्या मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये विविध कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आज दीडशे वर्ष झालेले हे नामांकित हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर आहे. अतिशय दर्जेदार तांत्रिक शिक्षण देणाऱ्या एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी आग्रही मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात अर्थसंकलपीय मागण्यांवर बोलतांना केली.
मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलला दीडशे वर्ष झाले. मात्र अतिशय अद्ययावत असलेले हे हायस्कूल आज बंद आहे. या प्रश्नावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांवर बोलताना सभागृहाचे लक्ष वेधले.
यावेळी सरकारचे लक्ष वेधत छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई शहरात ऐतिहासिक एल्फिन्स्टन हायस्कूल आहे. या हायस्कूलला सुमारे दीडशे वर्ष झाली आहे. या संस्थेत दर्जेदार असे शिक्षण देण्यात येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या हायस्कूल मध्ये सुमारे ४ वर्ष शिक्षण घेतले. तसेच प्रमोद नवलकर व सुदैवाने मलाही या हायस्कूलमध्ये शिक्षण घेता आले. या संस्थेतील सर्व वर्क शॉप आजही सुस्थितीत आहे. अनेक दिग्गज लोक या हायस्कूल मधून पुढे गेले. मात्र आज याठिकाणी अनेक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आज हे हायस्कूल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ही अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या ऐतिहासिक हायस्कूल मध्ये केंद्र शासनाच्या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण सुरू करण्यात येऊन या हायस्कूल ला गतवैभव प्राप्त करून द्यावे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती पहावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.