मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार
Santosh Gaikwad
April 22, 2024 11:38 PM
मुंबई, दि. २२ : मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नाव नोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी किंवा आपल्या क्षेत्रातील मतदार दुतांची मदत घ्यावी.व्होटर आयडी व्यतिरिक्त इतरही ओळखपत्रे वैध
मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/राज्य सरकार/ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे, श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.बेघर, देहव्यवसाय करणारे ओळखपत्राशिवाय नाव नोंदवू शकतात…
नव्याने नाव नोंदवू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसेल तर त्यांनी स्व-घोषणापत्र शासनास सादर करावे. स्व-घोषणापत्राद्वारेही मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. हे स्व-घोषणापत्र भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx या लिंकवर उपलब्ध आहे.
000