मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह, दोन महिन्यात कोणाला फाशी दिली ; मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे : वडेट्टीवार
Santosh Gaikwad
August 22, 2024 11:01 PM
मुंबई, दि. 21:-राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याचे सांगत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या नेत्यांची पोलखोल केली आहे. त्याचबरोबर दोन महिन्यात कोणाला फाशी दिली त्याचे नाव मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
वडेट्टीवार म्हणाले की, बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत सांगून मुख्यमंत्री धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? महायुती सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत.
हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त एसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? असा सवाल उपस्थित करत श्री. वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्र्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये.
वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूर बाहेरचे होते असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे.या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही. फक्त फेकाफेकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात महायुतीचे नेते पटाईत असल्याचे म्हणत वडेट्टीवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
०००००