भीतीची बाराखडी दिसणार ‘पंचक’च्या टायटल साँगमध्ये

Santosh Sakpal December 25, 2023 12:31 PM

सिने प्रतिनिधि SHIVNER/-

डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळीवेगळी सुरूवात असणारे हे गंमतीशीर गाणे सुहास सावंत यांनी गायले असून गुरू ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले आहे.

हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आणि मजेदार आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर  यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत .

गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’हे गाणे पडद्यावर पाहाणे जितके धमाल दिसतेय. तितकेच ते चित्रीत करणे खरंच आव्हानात्मक होते. चार कलाकार धावत आहेत आणि त्यांच्या मागे पाचवा कुत्रा धावत आहे. किती तरी वेळ कलाकारांच्या आणि कुत्र्याच्या धावण्यात मेळ साधला जात नव्हता. या गाण्याचे चित्रीकरण सलग दोन दिवस चालले. दोन दिवस हे कलाकार संपूर्ण गावभर पळत राहिले. हा सीन नैसर्गिक वाटावा, म्हणून ही सारी मेहनत होती. असे चित्रपट पडद्यावर पाहायला गंमतीदार दिसत असले तरी यामागे मेहनत खूप जास्त असते.’’

संगीतकार मंगेश धाकडे म्हणतात, ‘’ हे एक धमाल गाणे आहे. याचे काही भाग आधीच चित्रीत करण्यात आले होते. चित्रपटाचे जे वैशिष्ट्य आहे, ते गाण्यातूनही व्यक्त व्हावे, असे अपेक्षित होते. चित्रपटाच्या कथेची मजा गाण्यातही आणायची होती. आणि या गाण्यात या ओळी चपखल बसवण्यात आल्या. हे शब्द या परिस्थितीशी तंतोतंत जुळले आणि गाण्यात अधिकच रंगत आणली.’’