फेलोशिपचा लढा लांबण्याची राज्यातील विचारवंतांना भीती

santosh sakpal April 03, 2023 12:03 AM

संशोधकांसाठी रसद पुरवण्याचे आवाहन


मुंबई: - विविध विद्यापीठे आणि बार्टीने पात्र ठरवूनही फेलोशिपपासून वंचित ठेवण्यात आलेल्या ८६१ संशोधकांच्या आझाद मैदानातील आता आंदोलनाला दीड महिना होत आला आहे. पण त्याबाबत राज्य सरकारची बेपर्वाई आणि संवेदनशून्यता टोकाची दिसत असल्याने हा लढा दीर्घकाळ चालेल, अशी भीती  राज्यातील विचारवंत व्यक्त करु लागले आहेत.

अनुसूचित जातींमधील संशोधकांच्या न्यायाची ही लढाई जिंकण्यासाठी सर्वतोपरी रसद पुरवावी, असे आवाहन त्या विचारवंतांनी परिवर्तनवादी विद्यार्थी- युवक, कामगार, कर्मचारी यांच्या संघटना आणि  सेवाभावी संस्थाना आज केले.

फेलोशिपसाठी लढणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्यभरातून असंख्य विचारवंत, साहित्यिक, प्राध्यापक, अभ्यासक, कलावंत उभे राहिले आहेत. त्यांनी या प्रश्नावर राज्यपालांकडे दाद मागण्यांची भूमिका याआधीच घेतली आहे. त्यांनीच आज एका पत्रकाद्वारे निर्णायक लढ्यासाठी रसद मिळण्यासाठी आवाहन केले.

त्या विचारवंतांमध्ये डॉ रावसाहेब कसबे, अर्जुन डांगळे, दलित पँथरचे सहसंस्थापक ज वि पवार, ज्येष्ठ पत्रकार  दिवाकर शेजवळ, लक्ष्मण गायकवाड, सुनील कदम, उर्मिला पवार,हिरा बनसोडे, प्रा प्रज्ञा पवार, प्रा दामोदर मोरे, प्राचार्य रमेश जाधव, सतीश डोंगरे, डॉ विजय मोरे, प्रा एकनाथ जाधव, डॉ जी के डोंगरगावकर, डॉ महेंद्र भवरे, सतीश डोंगरे, प्रा सुनील अवचार, कुलदीप रामटेके, प्रा प्रकाश मोगले, ऍड विश्वास कश्यप,अरूणा जगियासी- जाधव, प्रा. आशालता कांबळे, रोहिणी जाधव, डॉ. अनुप्रीया खोब्रागडे, कल्पना मून, ॲड. सोनाली भगत , इंजिनिअर गौतम बस्ते, नवीन गायकवाड, आशा सकपाळ, प्रा. डॉ. सिंधू सकपाळ,सुरेखा पैठणे, डॉ अलका पवार, माया चव्हाण, आशा तिरपुडे,कुंदा निळे,माधवी कांबळे,गौतम सांगळे,ऍड लक्ष्मण कांबळे,कैलास गायवाड ,उषा अंभोरे, विनिशा धामणकर आदींचा समावेश आहे.

फेलोशिपसाठी आझाद मैदानात आंदोलन करणारे संशोधक हे पोलिसांनी हुसकावल्यानंतर रोज संध्याकाळी थेट कल्याणच्या बुद्धभूमी येथील विहारात आश्रय घेत आहेत. तिथे कर्मवीर मधूकरदादा तुपलोंढे प्रतिष्ठान आणि स्थानिक रहिवासी आंदोलक विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. मात्र धरण्याला बसल्यावर आझाद मैदानात त्यांच्या दुपारच्या जेवणाची भ्रांत अजून मिटलेली नाही, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांनी सांगितले.

आंदोलक विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी फोर्ट परिसरातील बँक कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी संघटना यांनी सहकार्य करावे, असे आवाहन साहित्यिक अर्जुन डांगळे आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी केले आहे.