नवीन अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग जाणून घ्या !
Santosh Gaikwad
July 23, 2024 04:55 PM
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (मंगळवारी) संसदेत 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. या अर्थसंकल्पात विविध योजना आणि विविध निर्णयांची घोषणा करण्यात आली.
यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टींच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कॅन्सरवरील औषधं, सोलार पॅनल, सोने, चांदी, लिथिअम बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वाहनं, चामड्याच्या वस्तू या सर्व गोष्टी स्वस्तात मिळणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी शिक्षण, रोजगार आणि शेतीबद्दल महत्त्वाच्या घोषणा केल्या.
100 शहरात औद्योगिक पार्क
देशातील 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क उभारले जाणार आहेत. पाच वर्षात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यात येणार आहे.
रोजगारासाठी 5 नव्या योजना
नव्या रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद केली जाणार आहे. 4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी पाच नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. आम्ही रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
10 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज
'देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक मदत करणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय.
पाच वर्षांसाठी गरीब कल्याण योजनेत वाढ
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली. याचा देशातील 80 कोटी लोकांना लाभ होणार आहे.
मुद्रा लोनची मर्यादा वाढवली
ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे आणि त्याची परतफेड केली आहे, त्यांच्यासाठी मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली जाईल.
महागाईचा दर 4 टक्क्यांवर स्थिर
भारताचा आर्थिक विकास होत आहे. तसेच पुढील काही वर्षांमध्ये हा विकास असाच निरंतर होत राहील. भारतामधील महागाईचा दर 4 टक्के असा स्थीर राहिल असं अर्थमंयत्र्यांनी म्हटलंय.
सोने स्वस्त
अर्थसंकल्पात सोनं-चांदीच्या सीमा शुल्कात कपात केली आहे. यापूर्वी हा दर १५ टक्के होता. यात कपात करुन सीमा शुल्क दर ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्यामध्ये प्रतितोळ्यामागे ३ ते ५ हजारांची घट झाली आहे. हे सामान्य नागरिकांना आनंदी करणारं आहे.
काय आहे नवीन कर प्रणाली
नवीन कर प्रणालीत सर्वांनाच म्हणजे वैयक्तिक करदाते, सिनीअर सिटीझन्स - ज्येष्ठ नागरिक, सुपर सिनियर सिटीझन्स - अति ज्येष्ठ या सगळ्यांसाठी एकच कररचना आहे.
3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही.
3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर
7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर
10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर
12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर
15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के दराने कर
स्वस्त झालेल्या वस्तू
कॅन्सर उपचारावरील औषध
सोनं-चांदी
मोबाईल चार्जर
मोबाईल
इलेक्ट्रिक वाहने
कपडे
आयात केलेले दागिने
चप्पल
प्लॅटिनम
लिथियम बॅटरी
विद्युत तारा
एक्स-रे मशीन
सोलार सेट
महागलेल्या वस्तू
प्लास्टिक वस्तू
टेलेकॉम संबंधीची उपकरणे
अमोनियम नायट्रेट