अंबरनाथ : अंबरनाथ आयटीआय जवळील ब्लु जेट हेल्थ केअर या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. धुरामुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला असून ३ ते ४ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेट हेल्थ केअर या केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्याने मोठी आग लागली. कंपनीत आग लागल्यानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. अवघ्या काही क्षणात आगीनं रौद्ररुप धारण केलं. आग इतकी भीषण होती की, दूरपर्यंत धुराचे लोट दिसून आले. केमिकल आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास होत आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ, आनंद नगर, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाडय घटनास्थळी पोहचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे