राज्यातील १२४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारणार : विखे पाटील
Santosh Gaikwad
June 14, 2024 11:04 PM
मुंबई, १४ : राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक विभागात अद्यापही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने १२४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचे पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असा विश्वास मंत्री विखे पाटील त्यांनी व्यक्त केला.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तथापि पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या राज्यात ५१२.५८ लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर १४४.५५ लाख मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जूनपर्यंत पुरेल असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला आहे. चाऱ्याचे प्रमाण कमी होत असताना शेतकऱ्यांना आणि पशूपालकांना जनावरांचे पालन पोषण करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत किंवा पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता देऊन शासन निर्णय जारी करण्याचे निर्देश दिले होते.
़़़