सर्वसामान्यांसाठी 2000 च्या नोटांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण

Santosh Sakpal May 20, 2023 02:50 PM

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

₹2000 च्या चलनी बँक नोटा – चलनामधून वापर थांबवण्यात येणार; लीगल टेंडर म्हणून सुरू राहतील

 1. 2000 रुपयांच्या बँक नोटा चलनातून का बंद केल्या जात आहेत?

2000 रुपयांच्या चलनी नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या बँकनोटांचा लीगल टेंडर दर्जा काढून घेतल्यावर अर्थव्यवस्थेमधील चलनाच्या गरजेची पूर्तता वेगाने करण्यासाठी आरबीआय कायदा, 1934 कलम 24(1) अंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. या उद्दिष्टाची पूर्तता झाल्यावर आणि इतर चलनी नोटांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यानंतर 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटांची छपाई थांबवण्यात आली. 2000 रुपयांच्या बहुतेक नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या आणि त्यांच्या अंदाजे 4-5 वर्षांच्या आयुर्मानानुसार या नोटा आयुर्मान समाप्तीच्या स्थितीत आहेत. या चलनातील नोटा सर्वसामान्यपणे फारशा वापरल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर प्रकारच्या चलनी नोटा जनतेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या “ क्लीन नोट पॉलिसी” चा विचार करता 2000 रुपयांच्या चलनी बँक नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. क्लीन नोट पॉलिसी काय आहे?

जनतेला चांगल्या दर्जाच्या बँक नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने अंगिकृत केलेले हे धोरण आहे.

3. 2000 च्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा कायम राहणार आहे का?

होय. 2000 रुपयांच्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा पुढे सुरू राहील.

4. 2000 रुपयांच्या बँक नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरता येतील का?

होय. सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते आणि त्यांना चुकती केलेली रक्कम म्हणून स्वीकारू शकते. मात्र, 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची त्यांना सूचना करण्यात येत आहे.

5. लोकांनी त्यांच्याकडे जमा असलेल्या 2000 रुपयांच्या चलनी नोटांचे काय करावे?

जनता त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटा त्यांच्या बँकेच्या शाखेत जमा करू शकते किंवा त्या बदलून घेऊ शकते.

2000 रुपयांच्या बँक नोटा आपल्या खात्यात जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे. आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट असलेल्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये (ROs) देखील नोटा बदलून घेण्याची सुविधा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे.

6. बँक खात्यांमध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटा जमा करण्यावर काही मर्यादा आहे का?

बँक खात्यांमध्ये कोणत्याही मर्यादेविना नो युअर कस्टमर(केवायसी) निकषांनुसार आणि लागू असलेल्या इतर वैधानिक/ नियामक गरजांनुसार नोटा जमा करता येतील.

 7. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना त्या रकमेवर परिचालनात्मक मर्यादा असेल का?

जनतेला एका वेळी रु. 20,000/- पर्यंत 2000 रुपयांच्या बँक नोटा बदलून घेता येतील.

8. 2000 रुपयांच्या चलनी नोटा बिझनेस करस्पॉन्डन्ट (BC ) कडून बदलून घेता येऊ शकेल का?

होय, खातेदारांना बिझनेस करस्पॉन्डन्ट द्वारे दररोज 4,000/- रुपये इतक्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येऊ शकतील.

 9. कोणत्या तारखेपासून नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल?

बँकांना पूर्वतयारी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळावा या हेतूने, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नोटा बदलण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 23 मे 2023 पासून बँक शाखा किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांशी संपर्क साधावा.

 10. बँकांच्या शाखांमधून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या बँकेचे खातेधारक असणे आवश्यक आहे का?

नाही, एखाद्या बँकेचा खातेदार नसलेली व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकते. एका वेळी केवळ 20,000 रुपयांपर्यंत नोटा बदलून घेऊ शकतात.

 11. एखाद्याला व्यवसाय किंवा काही इतर कारणांसाठी 20,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता असेल तर काय करावे?

बँकेच्या खात्यात नोटा कोणत्याही निर्बंधांशिवाय जमा करता येतील. 2000 रुपयांच्या बँक नोटा बँक खात्यात जमा करता येतील आणि या ठेवींच्या बदल्यात रोख रक्कम काढता येईल.

-------------------------------

1 अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम

 12. नोटा बदलून घेण्याच्या सुविधेसाठी काही शुल्क द्यावे लागेल का?

नाही, नोटा बदलण्याची सुविधा निःशुल्क आहे.

 13. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींना नोटा बदलणे किंवा जमा करणे यासाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का?

2000 रुपयांच्या बँक नोटा बदलणे किंवा जमा करणे या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

 14. जर एखादी व्यक्ती 2000 रुपये मूल्याच्या नोटा तातडीने जमा किंवा बदलू शकत नसेल तर काय होईल?

ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि लोकांसाठी सोयीची व्हावी यासाठी 2000 रुपयांच्या बँक नोटा बँकेत बदलणे किंवा जमा करणे या प्रक्रियेसाठी चार महिन्यांहून अधिक अवधी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी, त्यांच्या सोयीनुसार दिलेल्या वेळेत या सुविधेचा लाभ घ्यावा.

15. 2000 रुपयांच्या बँक नोटा बदलायला किंवा बँकेत जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे?

बँकेच्या सेवेत त्रुटी आढळल्यास तक्रारीचे निवारण करण्यासाठी, तक्रारदार/पीडित ग्राहक प्रथम संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. जर बँकेने तक्रार दाखल झाल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीच्या आत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद किंवा उत्तरामुळे ग्राहक संतुष्ट नसेल तर तक्रारदार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), 2021 अंतर्गत आर बी आयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तक्रार नोंदवू शकतो.