कोकणवासीयांच्या गणेशोत्सव प्रवासावर दलालांचा डल्ला ... आमदार राजू पाटील यांनी केली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी
Santosh Gaikwad
May 21, 2023 10:28 PM
कल्याण : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट अत्यंत बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहेत. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही. दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. त्यामुळे या आरक्षित तिकिटांचा आढावा घेऊन कोकणवासियांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकणवासियांच्या कोकण प्रवासाचा श्री गणेशा करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
गणपतीच्या दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकरांचा आधार असतो. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. मात्र पहिल्याच दिवशी व तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. मात्र अद्याप रेल्वे कडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये आमदार पाटील यांनी कोकण वासियांच्या व्यथा मांडल्या आहेत.वास्तविक दरवर्षी अशीच परिस्थिती दरवर्षी उद्भवली जाते. मात्र रेल्वे मंत्रालय यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हणाले आहेत कि, दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. असे असतानाही मंत्रालयाला कोणतंही गांभीर्याने नाही आणि याची कधी चौकशी देखील होत नसल्याने दलालांना संधी मिळत आहे. सर्व रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून कोकणवासियांचा प्रवास सुखकर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.