मुंबई दि. ७: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाप्पाचं वाजत-गाजत, मोठया थाटामाटात आज आगमन झाले. विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यंदा बाप्पाचं 31 वे वर्ष असून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रनगरीचे सर्व कर्मचारी एकत्र येऊन भक्तीभावाने हा गणेशोत्सव गेली तीन दशके साजरा करतात ही परंपरेची आणि एकात्मतेची साक्ष असल्याची भावना श्रीमती म्हसे पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान यंदाही मोठ्या जल्लोषात बाप्पाचं चित्रनगरीत आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यासाठी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि चित्रनगरीत चित्रीत होत असलेल्या निर्मितीसंस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
हा गणेशोत्सव अनंतचतुर्दशी पर्यंत साजरा होणार असून याकाळात विविध सामाजिक -सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजन करण्यात आले आहे.
......................