मुंबई : आमचा समाज कोणाही विरुध्द नाही. आमच्या विरुध्द कोणी जावु नका. आम्ही कुणावर अन्याय करणार नाही. आमच्यावर कोणी अन्याय केला तर याद राखा, अन्याय सहन केला जाणार नाही. आमच्या समाजात गटतट आहेत. मात्र डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही सर्व एक आहोत. जयभिमच्या बुलंद आवाजाने आम्ही एक आहोत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदीर सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित दलित पँथर सुवर्ण महोत्सव सोहळयात रामदास आठवले बोलत होते. यावेळी आयोजक रिपाइंचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, ज्येष्ठ साहित्यीक विचारवंत अर्जुन डांगळे, दिलीप जगताप, रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, रमेश मकासरे, श्रीकांत भालेराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शिलाताई गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, आदि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दलित पँथर सुवर्ण महोत्सवानिमीत्त दलित पँथरमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांची यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा रामदास आठवले यांनी यावेळी केली. तसेच उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून रिपाइंचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांची नियुक्ती रामदास आठवले यांनी यावेळी अधिकृत जाहीर केली.
आठवले पुढे म्हणाले की, आमच्याच पक्षात गट आहेत असे नाही तर इतरही पक्षात गटतट आहेत. गटबाजीमुळे इतर पक्षातील नेत्यांची एकमेकांवर होणारी आरोपांची चिखलफेक आपण पाहत आहोत, आमच्यात गटतट असले तरी इतर पुढा-यांवर मी कधीही टीका करीत नाही. दलित पँथर हे आक्रमक संघटन आहे. पँथर हा सत्ता मागणारा नसतो, पँथर हा संघर्ष करणारा हवा आहे. रिपब्लिकन पक्षाशी संलग्न ठेवून पुन्हा दलित पँथर कशी स्थापन करायची आणि तिचे स्वरुप कसे असेल याबाबत विचारवंताचे आपण मार्गदर्शन घेणार आहोत. दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी सोहळयात पुन्हा दलित पँथर सुरु करा अशी मागणी पुढे आल्याची माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी सर्व वंचितांना, बहुजनांना एकत्रित करण्याचा प्रयोग चांगला केलेला आहे. मात्र त्यांनी रिपब्लिकन नावाशी फारकत घेतली आहे. रिपब्लिकन हेच नाव व्यापक आहे. महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन संकल्पना आहे. रिपब्लिकन नाव सोडुन अन्य नावाने पक्ष चालविणे चुकीचे असल्याचे मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
मी कधीच बोललो नाही खोटं, म्हणुन मला याच पँथरने केलं मोठं ; माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोटं ; तरी माझं नेतृत्व झालं मोठं ;
मी कधीच केली नाही कुणाची चाकरी पण मला याच नाशिकच्या आयाबायांनी दिली चटणी भाकरी ;
जयभिमचा बुलंद आवाज ऐकत होतो शाहीरांच्या गाण्यात ..; म्हणून मी चालत होतो पँथरच्या बाण्यात ;
बुध्दांची समता मी ऐकत होतो वामनदादांच्या गाण्यात, गावागावात फिरत होतो
तेव्हा झोपायला मिळत नव्हता मला बेड ; पण मला लागले होते दलित पँथरचे वेड!
बरेच खात होते तुपाशी, पण ब-याच वेळा मी राहत होतो उपाशी अशी कविता रामदास आठवले यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.