मुंबईकरांसाठी गुड न्यूज : मुंबईतील धरण ओव्हरफ्लो !
Santosh Gaikwad
August 04, 2024 10:14 PM
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मुंबईतील धरण ओव्हरफ्लो होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबईतील पाचवा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सध्या सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे
मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ हे तलाव आज ओव्हरफ्लो झाले. रविवारी ४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी हे धरण पूर्णपणे भरले. यानंतर या तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. सध्या या वैतरणा धरणातून ७०६.३० क्युसेक या दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागले होते. त्यापाठोपाठ आज ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्री भरलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 193,530 दशलक्ष लीटर (19,353 कोटी लीटर) इतकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 102.4 मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन 2014 मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे.