आचारसंहितेत सरकारी जाहिराती : उध्दव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घाणाघात !

Santosh Gaikwad March 26, 2024 06:41 PM


 मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही वर्तमानपत्रातून येणा-या सरकारच्या जाहिरातीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. 'आचारसंहिता लागू केली असेल आणि कायद्यासमोर जर सगळे सारखे असतील तर वर्तमानपत्रातून येणाऱ्या सरकारच्या जाहिराती बंद झाल्या पाहिजेत. कारण त्यावर घटनाबाह्य सरकारचे फोटो येताहेत, पंतप्रधानांचे फोटो येताहेत. जर जाहिराती सुरू ठेवायच्या असतील तर त्याचा खर्च प्रत्येकाच्या खात्यातून जमा केला पाहिजे अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. भायखळा येथील पक्षाच्या शाखाभेटीवेळी त्यांनी मोदी सरकारवरही घाणाघात केला. 


शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, लोकशाही देशात खरोखर राबवायची असेल तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि जसे पक्षाचे नेते फिरतो तसं त्यांनी फिरलं पाहिजे. तुमच्या लवाजम्याचा खर्च सरकारच्या तिजोरीतून, करदात्यांच्या पैशातून होणार. पंतप्रधान देशाचा असतो, पक्षाचा नसतो. जर पंतप्रधान भाजपचा प्रचार करणार असतील तर त्यांनी सगळ्याच पक्षांचा प्रचार करावा. तर आम्ही मानू की आम्ही मोदी परिवार आहोत. पण निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडून आल्यावर सबको लाथ आणि दोस्तोंका विकास.' असं उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. 



रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. 'रेल्वे स्टेशनची नावं बदलण्यासाठी एका उडाणटप्पूने सांगितलं की त्यांनीच पत्र दिलं आणि नावं बदलण्यात आली.  रेल्वे स्टेशनची नावं जरूर बदला, पण स्वतःला डबल इंजिन सरकार म्हणतात, आता ते ट्रिपल इंजिन झालं आहे. अशोक चव्हाणांचं चौथं इंजिनही सरकारला लागलं आहे. पण या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत. त्याचं काय ? आता मेट्रो, मोनो, इलेक्ट्रिक गाड्या आल्यात. पण आमच्या लहानपणी एक गाणं होतं, झुकझुक झुकझुक आगीन गाडी, धुरांच्या हवेत सोडी.. आणि वाफेवर चालणारं इंजिन होतं. यांचं थापेवरती चालणारं इंजिन आहे, ते वाफा सोडायचं हे थापा सोडताहेत. सगळ्या थापा आणि थापा असेही ठाकरे म्हणाले.  



शिवसेना फुटीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत शिवसेना फोडण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. इथेच जवळच माझगावमध्ये झाला होता. आणि त्याला एका साध्या सैनिकाने आडवा केला होता. त्यामुळे गद्दारांना गाडणं हे आपल्या रक्तातच आहे. यावेळी नुसती गद्दारी नाही तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. जे बूट चाटणारे गद्दार सत्तेच्या खुर्चीसाठी चाटुगिरी करताहेत, त्यांना एवढं पण कळत नाही, त्यांनी आईच्या कुशीवर वार केला आहे. ज्या शिवसेनेने महाराष्ट्राची, मराठीची अस्मिता आणि हिंदुत्वाचं रक्षण केलं, ती ताकद त्यांच्याच माध्यमातून संपवली जातेय हे त्या लाचारांना कळत नाही. कारण ते खोक्यात एवढे बंद झालेत. त्यांच्या डोळ्यावरती नोटांची झापडं लागली आहेत. त्यांना कळतच नाही आपण काय करत आहोत. ही नुसती पक्ष फोडाफोडीची गोष्ट असती तर वेगळा भाग होता. पण त्यांना महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेत तुम्ही गद्दार झालात तरी मर्द संपलेले नाहीत. ते संपू शकत नाहीत.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.