मुंबई, २५ : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाड्यात काही भागात पिके करपायला लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीकरिता नोटिस बजावण्यात येत आहे. अशातच शिंदे फडणवीस सरकारने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना पाठवण्यात येणारी बँकांची नोटीस तात्काळ थांबवून कर्जमाफी करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यात जून,जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देखील सरासरी पेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दिनांक १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. एका बाजूने आसमानी त्यामुळे शेतकऱ्यांची पीक हातातून गेली आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात येत आहे.
शेतकरी,शेतमजूर यांच्यप्रती शिंदे फडणवीस सरकार बोथट झाले असून हे सरकार भावनाशून्य आहे. लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही पिक विमा कंपन्यांनी त्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. खतांचा काळाबाजार झाला आहे. बियाणं मिळत नव्हते, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला होता तरीही शेतकऱ्यांनी कसंतरी पैसे उभे केले आणि पीक घेण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे कृषीमंत्री बीडच्या सभेत व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री सुटबुट घालून जपानला आहेत आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली कोण असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिस येत आहेत. दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना शिंदे फडणवीस सरकारचां एवढा जाच का, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार म्हणाले की जे अजित पवार आजपर्यंत नोटीस आल्यानंतर भूमिका मांडत होते तेही आता काहीच बोलत नाही मी या झोपेचं सोंग घेतलेला सरकारला जागं करीन आणि रस्त्यावर उतरवून शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो हे दाखवून देइन. शेतकऱ्यांनी बँकेकडून येणाऱ्या नोटिसांना घाबरून न जाता त्या माझ्याकडे पाठवून द्या. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
ooo