महाराष्ट्राच्या राजकारणात बीआरएस पक्षाची एन्ट्री : ग्रामपंचायती निवडणुकीत पहिला विजय !
Santosh Gaikwad
May 19, 2023 01:21 PM
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रेशखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या नव्या पक्षाला महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिलाच विजय मिळवला आहे. आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएस पक्षाचा गफार सरदार पठाण उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात बीआरएसची एन्ट्री झाली आहे. राज्यात १९ आणि २० मे रेाजी नांदेड येथे बीआरएस कार्यकत्यांचे दोन दिवसीय अधिवेशन होत असून महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची रणनिती आखली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी पोटनिवडणूक पार पडली या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहिर झाला. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएस पक्षाचा गफार सरदार पठाण उमेदवार विजयी झाला आहे. बीआरएसचा राज्यातील हा पहिलाच विजय आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली होती. बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्थरावर वाढवण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सभा देखील घेतल्या आहे. तर आगामी सर्वच निवडणुका लढवणार असल्याचं निर्णय देखील या पक्षाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत देखील बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते रिंगणात उतरले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. नांदेड शहरातील अनंता लॉन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर असणार असून, यासाठी स्वतः के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. तर अनेक माजी आमदार, खासदार यांच्यासह इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे देखील बीआरएसमध्ये प्रवेश होत आहे. तर आगामी काळात देखील असेच प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बीआरएसकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे.
बीआरएसचे मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे येथे झोनल कार्यालये आणि सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात पक्ष कार्यालये उघडण्याची योजना आहे. 'अबकी बार, किसान सरकार' हा नारा देत बीआरएस महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले जात आहे.