शिर्डी विमानतळाचा महाविस्तार, शिर्डीकरांचे स्वप्न साकार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Santosh Gaikwad
February 05, 2024 10:14 PM
मुंबई, दि. ५ : साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा अधिकचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य विकास कामांना आज राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळाचा महाविस्तार होणार असून त्यानिमित्ताने समस्त साई भक्तांसह अवघ्या शिर्डीकरांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांसोबतच शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांना मंत्रिमंडळ बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
यामध्ये दर्जेदार टर्मिनल उभारणी, अँप्रानचे विस्तारीकरण व इतर कामांसाठी ८७६ कोटी २५ लाख व उर्वरित कामाकरिता रुपये ४९० कोटी ७४ लाख खर्चास कार्योत्तर मान्यता देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही सर्व विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये भुसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सर्वेक्षण व माती परिक्षण, धावपट्टीचे विस्तारीकरण आदी तांत्रिक कामांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात समस्त साई भक्तांसह अवघ्या शिर्डीकरांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देता येणार आहेत, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
०००००