मुंबई : मुंबईतील केईएम , टाटा रुग्णालय अशी महत्वाची रुग्णालये ज्या परिसरात आहेत त्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नाही. त्या परिसरात असणाऱ्या इमारतीचा पुनर्विकास करताना सरकारने वाढीव एफएसआय द्यावा व या वाढीव भागात हेल्थ कॉरिडोर जाहीर करत रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करावी. अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी केली.
परळ येथे असणारी ही रुग्णालये देशभरातून आलेली रुग्ण संख्या व त्यांच्या नातेवाईकांनी भरून गेली आहेत. रुग्ण बेडवर असतो मात्र नातेवाईक रस्त्यावर झोपलेला असतो. काही सामाजिक संस्था रात्रंदिवस कार्यरत आहेत. मात्र सरकारने जर या प्रकरणी गांभिर्याने लक्ष दिले नातेवाईकांची मोठी सोय होईल असे जठार यांनी यावेळी सांगितले.
या भागाचा सध्या मोठ्या प्रमाणत पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे सरकारने आत्ताच डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हेल्थ कॉरिडोर जाहीर करावा यासाठी मी सरकार , पालिका व इतर सर्व प्राधिकरणाला निवेदन दिले आहे. आत्तापर्यंत अशी कल्पना कुणी आमच्यापर्यंत आणली नाही असे पालिकेने व सरकारच्या वतीने सांगितले गेले असल्याने आपली मागणी पूर्ण होईल असा विश्वास जठार यांनी यावेळी व्यक्त केला.