राज्यातील २ कोटी पुरुषांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पार

Santosh Gaikwad December 26, 2023 11:42 PM


मुंबई, दि. २५ः
 निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे या अभियानांतर्गत राज्यातील २ कोटी ५ लाख ४२ हजार पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण केली. त्यापैकी १ कोटी ९५ लाख ६९ हजार ८०९ लाभार्थ्यांच्या शासकीय आरोग्य संस्थांमार्फत आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. सुमारे ४ कोटी पुरुषांच्या मोफत आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले असून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ही मोहीम सुरू राहील.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत आतापर्यंत २ कोटी पेक्षा अधिक पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. या अभियानांतर्गत २३ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ वर्षांवरील २ कोटी ०५ लाख ४२ हजार १६१ पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण झाली. त्यापैकी १ कोटी ९५ लाख ६९ हजार ८०९ लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढवला जाईल. गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष अँपची निर्मिती केली आहे. या अँपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, चाचण्यांची नोंद विशेष अँपवर केली जाईल.


येथे होईल आरोग्य चाचणी

आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.