ठाकरे - शिंदे गटाच्या आमदारांची आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी

Santosh Gaikwad September 14, 2023 10:24 AM


मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयानंतर तब्बल पाच महिन्यांनी विधानसभेतील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना (ठाकरे) आणि शिंदे गटाच्या आमदारांवर एकत्रितरीत्या आज गुरुवारी सुनावणी होणार आहे. दोन्हीकडून या सुनावरीला सामोरे जायचे नियोजन करण्यात आले आहे.  सुनावरीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. सरकारने निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.


विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणी १२ वाजता होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने (ठाकरे) गटाच्या आमदारांची बैठक होत आहे तसेच शिंदे गटाच्या आमदारांनीही बैठक बोलावली असून वकिल उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे शिवसेनेच्या (ठाकरे) आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपले म्हणणे मांडण्यास विचारले गेल्यास आमदार आपली भूमिका मांडतील.



 दरम्यान, याआधी शिवसेनेच्या (ठाकरे) आमदारांनी अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केले होते. अगदी तशाच प्रकारे सुनावणी दरम्यान १४ आमदारांनी वकीलपत्रात आपले लेखी म्हणणे अध्यक्षांकडे सादर केले आहे. आता ही सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र सादर करण्यात आले आहेत. तसेच शिंदे गटाकडून ६००० पानी वकीलपत्र सादर करण्यात आले आहे. या लेखी उत्तराबरोबरच उद्या काही पुरावेही शिंदे गटाकडून सादर केले जाणार आहेत. आपलाच पक्ष हा अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा युक्तिवाद पुन्हा एकदा शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांसमोर केला जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.