काळजी घ्या : आजपासून मुंबई ठाण्यासह कोकणात उन्हाच्या झळा

Santosh Gaikwad April 27, 2024 07:43 AM



मुंबई :  मुंबई , ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनाही कडक उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणात  २८ आणि २९ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याचा अंदाज आहे. याआधी  १५  आणि  १६  एप्रिल या दोन दिवसांत मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ जाणवली. त्यावेळी नवी मुंबईत पारा ४१ अंश, पनवेलमध्ये ४३ अंश सेल्सियसवर गेला होता.

 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.


राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.