मुंबई, दि. २ः राज्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यातील ६६ गावांना फटका बसला. १२६ घरांचे नुकसान झाले. एन.डी.व्ही.आय (सामान्यकृत वनस्पती निर्देशांक) निकषावर नुकसान निश्चित केली आहे. सर्व विभागीय आयुक्तांकडून सुधारित अनुदान मागणीचा प्रस्ताव आल्यावर निधी वितरीत केला जाईल, असे छापील उत्तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल राठोड यांनी तारांकीत प्रश्नांवर दिले आहे.
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच पोलादपूर, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शी टाकळी तालुक्यातील गहू, हरभरा, तूर, कांदा, मका, ज्वारी, मूग, भूईमूग व पान पिंपरी इ. रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, चिकू, आंबा, केळी, पपई, टरबूज, द्राक्ष आदी फळबागांचे व पशूधनांचेही नुकसान झाले. पातुर तालुक्यातील ७४ गावांतील ४ हजार ६० हेक्टरवरील पिकांचे आणि ६६ घरांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, विलास पोतनीस, सुनील शिंदे, डॉ. प्रज्ञा सातव आदींनी तारांकित प्रश्न विचारला होता. मंत्री राठोड यांनी त्यावर उत्तर दिले.
पातुर तालुक्यातील ६६ गावांना गारपिटीचा फटका बसला. १० हजार ४६८ बागायत आणि फळ पिकांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणावरून दिसून येते. घराच्या नुकसानीच्या मूल्यांकनासाठी पंचायत विभागातील बांधकाम खात्याकडे जबाबदारी सोपवली आहे. मुल्यकंन अहवाल प्राप्त होताच, नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल. तसेच एन.डी.आय.व्ही. (सामान्यकृत वनस्पती) निकष वापरून शेतपिकांचे नुकसान निश्चित करण्यासाठी त्याबाबतची तपासणी वसंतराव नाईक मराठवाडा, कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. सुधारित अनुदान मागणीचा प्रस्ताव सर्वविभागीय आयुक्तांकडून मिळाल्यानंतर निधी वितरणाची कार्यवाही तात्काळ सुरू करणार असल्याचे पाटील यांनी उत्तरात म्हटले आहे.