राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार ; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका
Santosh Gaikwad
August 27, 2024 09:08 PM
मुंबई : राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार आहे. जनतेत असुरक्षिततेचं वातावरण, हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे.'महाराष्ट्रात कायदासुव्यवस्थेचं राज्य अस्तित्वात आहे की नाही' असा सवाल एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरटीका केली आहे. विविध गुन्ह्यांच्या घटनांचा संदर्भ देत या घटनांना गृहमंत्री जबाबदार असल्याचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य अस्तित्वात आहे की नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झालीय. आता पुण्यात तरुणीचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे. रत्नागिरी येथे एका तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली. याखेरीज पुणे परिसरातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आले. दुसरीकडे गुन्हेगारांना कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नसून पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार केल्याची घटनाही घडली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. हे सत्ताधाऱ्यांचे विशेषतः गृहमंत्र्यांचे घोर अपयश आहे. राज्यातील ढासळलेल्या कायदा सु्व्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत.