हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हेचा 'हल्ला गुल्ला' : 'फकाट' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

Santosh Sakpal May 14, 2023 09:38 PM

 सिने प्रतिनिधि


         प्रेमगीत, आयटम सॉंगनंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील एक भन्नाट, उडत्या चालीचे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जिंदगी आता झाली हल्ला गुल्ला' असे बोल असलेल्या या गाण्याला  कौतुक शिरोडकर, हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर यांचे बोल लाभले असून  हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे जबरदस्त संगीत लाभलेले हे गाणे गायलेही त्यांनीच आहे. हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

    हे गाणे ऐकायला जितके स्फूर्तिदायी आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आणि कलरफुल आहे. या गाण्यात हेमंत आणि सुयोगकडे भरपूर पैसा आल्याचे दिसत असून ते भौतिक सुख अनुभवत असल्याचे या गाण्यात दिसतेय. या गाण्यात रॅपही अनुभवायला मिळत आहे. जे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी केले आहे.

     या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात, '' या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसतेय. तरुणाईला आवडेल असे या गाण्याचे शब्द आणि संगीत आहे. तरुणाईचा वेस्टर्न सॉंगकडे कल जास्त आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे, संगीतप्रेमींना आवडेल असे आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शकही मराठीतील एक नावाजलेले रॅपर आहेत. त्यामुळे त्यांचाही मदत या गाण्यासाठी झाली आहे. त्यांच्या रॅपने या गाण्यात अधिकच रंगत आणली. हे गाणे करताना मजा आली.'' 

    हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, रसिका सुनील, अनुजा साठे, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.