मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही : शरद पवार

Santosh Gaikwad June 09, 2023 11:07 PM


मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे .  या धमकीनंतर शरद पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले  ‘ मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ असे पवार म्हणाले.


शरद पवार यांना समाजमाध्यमावर तुमचा नरेंद्र दाभोळकर करू अशी धमकी आली आहे. त्यावर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी सरकारवर आहे. पोलिस दलावर पूर्ण विश्वास आहे आणि धमकीची चिंता मी करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.