मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उद्या भाजपचे शक्तीप्रदर्शन !
Santosh Gaikwad
April 08, 2024 07:41 PM
ठाणे : ठाणे , कल्याण लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेचा महायुतीचा उमेदवार घोषित केले. त्यामुळे एक प्रकारे कल्याणचा प्रश्न निकाली काढत, ठाण्यावर आपला दावा भक्कम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात भाजपच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयाचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपकडून ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकलेला असताना आणि त्यासंबंधीचा तिढा सुटलेला नसताना भाजप उद्या ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाण्याचे 'ठाणेदार' आपणच असल्याचे अप्रत्यक्षरित्या दिसून येत आहे. ठाणे शहरातील पोखरण रोड क्रमांक एक येथे असलेल्या या कार्यालयाच्या सभोवतीचा परिसर आजपासूनच भाजपच्या झेंड्यांनी वेढला आहे. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आज या कार्यालयात सुरु असून ठाण्यातील कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री फडणवीस बदलापूर येथे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला रवाना होणार असल्याचे वरिष्ठ भाजप नेत्यांनी सांगितले.
कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याने, आता ठाणे लोकसभा मतदारसंघ हिसकाविण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. पडद्यामागे त्यासंबंधीची रणनीती आखण्यात येत आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून ठाण्यात भाजपचा अप्रत्यक्षरीत्या दावा असल्याचे बोलले जात आहे.