नवीन संसद भवन हे भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नाचं प्रतिबिंब : नरेंद्र मोदी

Santosh Gaikwad May 28, 2023 03:45 PM


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि मंत्रोपच्चारासह नवीन संसदेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. सर्व देशवासीयांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. 'हे केवळ भवन नाही, १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नाचं प्रतिबिंब आहे,  नवीन संसद भवनामुळे आपणा सर्वांची मने अभिमानाने आणि आकांक्षांनी भरून जाणार आहेत.ही भव्य-दिव्य इमारत सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणासह देशाची संपन्नता आणि सामर्थ्य यांना नवी गती आणि शक्ती देईल असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. 


नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. यामध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक सेंगोल (Sengol) अर्थात राजदंडाची स्थापना पंतप्रधान मोदींनी केली आहे पीएम मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या पूजेला बसले होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला. हे राजदंड हातात घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.

  

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होत असताना, आपल्या सर्वांची हृदये आणि मने अभिमान, आशा आणि वचनांनी भरून गेली आहेत. ही प्रतिष्ठित इमारत सक्षमीकरण करणारी आणि नव्या स्वप्नांना पंख देणारी ठरेल आणि त्यांची जोपासना करून त्यांना प्रत्यक्षात उतरवेल. या इमारतीच्या माध्यमातून आपला महान देश प्रगतीची नवी उंची प्राप्त करो हीच सदिच्छा. 



आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करत असताना, एक सशक्त, आत्मनिर्भर, सर्वसमावेशक आणि विकसित भारत तयार करण्याचे ध्येय आहे. भारताची शक्ती, देशाच्या एकतेवर अवलंबून आहे. देशाच्या प्रगतीत जे लोक अडथळे आणतात आणि विविध आव्हाने उभी करतात, त्या लोकांबद्दल पंतप्रधानांनी देशाला सतर्क केले. "जे लोक देशाच्या प्रगतीत अडथळे आणतात, ते आपली एकता तोडण्याचा देखील प्रयत्न करतील. मात्र, मला खात्री आहे की आपल्या संस्थांच्या माध्यमातून देशाला मिळत असलेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तीच्या जोरावर प्रत्येक आव्हानाचा सामना करू असे पंतप्रधान म्हणाले.


भारत आज जागतिक लोकशाहीचा मोठा आधार आहे. लोकशाही आमच्यासाठी व्यवस्था नसून संस्कार आहे, विचार आहे, परंपरा आहे, असं मोदी म्हणाले. नव्या संसदभवनात वारसा आहे, कला कौशल्य आहे, संस्कृती आहे आणि संविधानाचे संस्कार देखील आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनासाठी राजस्थानातून ग्रेनाईट, महाराष्ट्रातून लाकूड आणलंय, या संसद भवनातून एक भारत श्रेष्ठ भारताचं दर्शन होईल, असं मोदींनी सांगितलं. 


नव्या संसद भवनातील राजदंडाचे वैशिष्ट्य काय? 


सातव्या शतकात एका तमिळ संताने या राजदंडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते.- अफाट साम्राज्यविस्तार करणाऱ्या चोल राजघराण्यात सत्तेचे हस्तांतरण या राजदंडाद्वारेच केले जायचे.- इंग्रजांकडून सत्ता सोडायचा क्षण आला तेव्हा हस्तांतर म्हणजे नेमकं काय करायचं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांनी विचारलं. त्यावर नेहरुंनी सी राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली.- राजगोपालचारी यांनी तामिळनाडूतल्या चोल साम्राज्यातल्या या जुन्या परंपरेची माहिती दिली होती.- त्यानुसार हा राजदंड 15 ऑगस्ट 1947 च्या सत्ता हस्तांतरणावेळी वापरण्यात आला होता. त्यानंतर हा राजदंड प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवला गेला होता.- आता हा राजदंड नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आला आहे.- संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्जीशेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे.