शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू चे १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Santosh Gaikwad January 08, 2024 08:49 AM


 रायगड- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्य कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आढावा घेतला. कार्यक्रमाचे दिमाखदार आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


            मुख्यमंत्री  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  पूर्वतयारी आढावा बैठक नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय. एस. चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, प्रधान सचिव तथा माहिती जनसंपर्क महासंचालनालायचे महासंचालक ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर असलेल्या या सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन देखील दिमाखदार व्हावे. सिडको, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा व मनपा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग या  सर्व यंत्रणानी आवश्यक त्या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी. तसेच सर्व यंत्रणानी कामामध्ये परस्पर समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच कार्यक्रम नियोजनामध्ये तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्था यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही सांगितले.


            अटल सेतूच्या शिवडी आणि चिरले या दोन्ही ठिकाणचा परिसर सुशोभित करण्यात यावा. तसेच या संपूर्ण मार्गाची नियमित स्वच्छता ठेवावी. चिरले ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गांवर रोड फर्निचरचा वापर करावा. या मार्गाचे सुशोभिकरण, सौंदर्यीकरण, आवश्यकता असेल तेथे दुरुस्ती तसेच परिसरातील भिंती रंगविणे आणि हरित पट्टे तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या.


            पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, मोठ्या प्रमाणावर वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास कोणतीही अडचण होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी  व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या.