गागोदे : गागोदे येथील विनोबा जन्मस्थान परिसरातील 'जय जगत भवन' या वास्तूचे व सभागृहाचे उदघाटन दि. १४ एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार, संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना कुमार केतकर यांनी विनोबांच्या आठवणींना उजाळा दिला. सद्य राजकीय-सामाजिक स्थितीवर, विशेषतः मोठ्या प्रमाणात घडवून आणल्या गेलेल्या धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करत त्यांनी विनोबांचा सर्वोदय विचारच अंतिमतः भारतीय समाजाच्या उत्थानासाठी आधारभूत ठरेल असे सांगितले.
'जय जगत भवन' ही वास्तू कुमार केतकर राज्यसभा सदस्य असताना त्यांनी दिलेल्या खासदार निधीतून बांधण्यात आली आहे.
या प्रसंगी, इमारत व सभागृहाचे विद्युतीकरण करून देणाऱ्या अनार्डे संस्थेचे देवाशीष चौधरी आणि 'एसबीआय फाउंडेशन'चे किरण घोरपडे यांनी आपल्या संस्थांची माहिती दिली व आपले मनोगत व्यक्त केले.
१३-१४ एप्रिल या दोन दिवसांच्या कार्यक्रमात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुलाखत उत्पल व.बा. यांनी घेतली. या मुलाखतीत हर्षवर्धन सपकाळ यांनी, सर्वोदय विचारांशी त्यांची नाळ कशी जुळली यावर मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच महाविद्यालयात असताना युवक काँग्रेसचे सदस्यत्व ते आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद या प्रवासाचे मर्मही उलगडून दाखवले. अध्यक्षपद स्वीकारल्यापासून पक्ष-पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. धार्मिक-जातीय विद्वेषाने पोखरल्या गेलेल्या आजच्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या संस्था, संघटना आणि काँग्रेस यांनी समन्वयाने काम करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
राज्यशास्त्राच्या अभ्यासक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रीसर्च' मध्ये मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. चैत्रा रेडकर यांनी यावेळी 'धर्म, धार्मिकता आणि धर्मनिरपेक्षता' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
काँग्रेसच्या 'संगम' या प्रशिक्षण विभागाशी जोडलेले आशुतोष शिर्के यांनी 'युवकांशी रीकनेक्ट होताना' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विनोबा विचारांचे अभ्यासक हेमंत मोने यांनी १८ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या भूदान जयंतीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भूदान यात्रेच्या संदर्भात उपस्थितांशी संवाद साधला.
ज्येष्ठ गांधीवादी, बेळगाव परिसरात पाणलोट विकास क्षेत्रात भरीव कार्य करणारे व दोन लाख वृक्षलागवड करणारे शिवाजीदादा कागणीकर यांचा या कार्यक्रमात कुमार केतकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शिवाजीदादा कांगणीकर यांनी आपले मनोगतही व्यक्त केले.
सायकलवरून फिरते वाचनालय चालवणारे ज्येष्ठ सर्वोदयी जीवन इंगळे यांनी त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
अर्थतज्ज्ञ आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी आजच्या पर्यावरणीय संकटाबद्दल गांधीविचारांच्या परिप्रेक्ष्यातून मांडणी केली.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात, कु.सई रावकरचे सतारवादन, अंगराज म्हात्रे यांचे बासरीवादन व मेघा इंगळे यांचे शास्त्रीय गायन झाले. वल्लभ काबरा यांनी भजन तर शर्वरी व गोगोदे ग्रामस्थ संदीप पाटील, अर्चना जठार, प्राजक्ता कोलीस्ते, प्रज्ञा सानप, वैशाली कदम व काजल ऐनापुरे यांनी गीत व भजन सादर केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात, प्रबोधनपर लघुपट करणारे, रुपक साने यांनी निसर्गाचे सौंदर्य उलगडणारा लघुपट दाखवला. तर बालचित्रकार कु. वरद गावंड याने, कार्यकर्ते विलास गावंड यांचे व्यक्तिचित्र काढले. रांगोळी कलाकार हंसाबेन यांनी रांगोळी काढली. नखाएवढे लघुशिल्प करणारे हेमंत चिंचावले यांनी, विनोबा, म.गांधी, सुनीता विल्यम्स, वल्लभभाई पटेल यांचे लघुशिल्प मांडले होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमास अ.भा. सर्वोदय मंडळाचे (सर्व सेवा संघाचे) विश्वस्त प्रा. सोमनाथ रोडे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष शंकरराव बगाडे, मुंबई सर्वोदय मंडळाचे सचिव शेख हुसेन, पत्रकार अमेय तिरोडकर, आलोक देशपांडे, प्रसाद रावकर व समीर परांजपे, प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईचे सचिव अनिल जोशी व नंदकुमार बागवडे, युसुफ मेहेरअली सेंटर - पनवेलचे सचिव मधु मोहिते, शांतिवन-पनवेलचे विष्णू प्रभूदेसाई, सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप पाटील, गागोदे ग्राम मंडळाचे माजी उपाध्यक्ष भरत महाडिक, रायगडच्या लढवय्या नेत्या उल्का महाजन, विलास नाईक, लेखिका व 'प्रेरक ललकारी'च्या संपादिका शारदा साठे इ. मान्यवर उपस्थित होते.
विनोबा आश्रमाचे विजय दिवाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सचिव उत्पल व.बा. यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नीला आपटे यांनी आभार मानले. प्रमुख पाहुणे व वक्ते यांचा सत्कार ज्ञानप्रकाश मोदानी, श्रीराम जाधव, सरिता राजभर, माधव सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातून ८० कार्यकर्ते आले होते तर गागोदे गावातील २५ ग्रामस्थ उपस्थित होते.