भारतीय संघाने दिली दिवाळीची विजयाची भेट, शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा १६० धावांनी केला पराभव

Santosh Sakpal November 12, 2023 09:36 PM

ODI World Cup 2023

भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला

भारताने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला आहे. डच संघासमोर 411 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 47.5 षटकात 250 धावांवरच मर्यादित राहिला. नेदरलँडचा शेवटचा फलंदाज भारतीय कर्णधार रोहित शर्माने बाद केला. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतके झळकावली. भारताच्या 410 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ 47.5 षटकात 250 धावांवर सर्वबाद झाला. नेदरलँडसाठी तेजा निदामनुरूने 39 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. बरातकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्माला प्रत्येकी 1 यश मिळाले.

आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विश्वचषकात सलग ९ सामने जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. टीम इंडियाचा पहिला सेमीफायनल १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे.

 

 भारतासाठी हा फक्त एक विजय ठरला नाही. या विजयासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे. आतापर्यंत भारतीय संघाला अशी कामगिरी कधीच करता आली नव्हती. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मात्र भारतीय संघाने यावेळी इतिहास रचला आहे.

या वर्ल्ड कपची सुरुवात भारताने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभूत करून केली होती. त्यांनतर एकामागून एक भारताने विजय मिळवले. पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या दिग्गज संघांना भारताने पराभूत केले. त्यानंतर आता भारताने नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील आपला अखेरचा सामनाही जिंकला आहे. भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. जो आतापर्यंत एकाही संघाला या वर्ल्ड कपमध्ये जमलेला नाही. यापूर्वी भारताने १९८३ आणि २०११ या वर्षी झालेले वर्ल्ड कप जिंकले होते. कपिल देव आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला होता. त्यानंतर आता भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला जे जमले नव्हते ते यावेळी त्यांनी करून दाखवले आहे. कारण या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी फेरीत पराभव पत्करावा लागला होता. २०११ चा वर्ल्ड कप सर्वांनाच आठवत असेल. या वर्ल्ड कपमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पराभूत केले होते. पण या वर्ल्ड कपमध्ये मात्र भारतीय संघ हा अपराजित राहीला आहे. एकही सामना त्यांनी गमावलेला नाही आणि वर्ल्ड कपमध्ये ही गोष्ट भारताकडून पहिल्यांजाच घडली आहे. त्यामुळे भारतीय संघाने एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे आता बाद फेरीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताचा यापुढे सेमी फायनलचा सामना हा न्यूझीलंडबरोबर १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.